रहस्यमय खिडकी गावापासून तीन किलोमीटर दूर, काळ्या पाषाणात बांधलेला सरनाईकांचा साडेतीनशे वर्षे जुना वाडा उभा होता. कौलारू छप्पर, आभाळाला भिडणाऱ्या भिंती आणि चारही बाजूंनी दाट जंगल. वाड्याभोवतीची दलदल पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होती. गावकरी म्हणत, “त्या दलदलीत गेलेला माणूस परत येत नाही.” सरनाईक कुटुंब मात्र या गोष्टी हसून उडवून लावत असे. कर्नल साहेबराव सरनाईक सैन्यातून निवृत्त झालेले. पत्नी सीमाताई, मुलगी रिटा, मुलगा राहुल. बाप-लेकाला जंगलभ्रमंतीचे वेड, आणि त्यांचा टॉमी कुत्रा सावलीसारखा त्यांच्या मागे. त्यांचे जिवलग स्नेही आशाताई आणि अशोकराव सरंजामे. आशाताई मुख्याध्यापिका, तर अशोकराव निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर. दरवर्षी कोजागिरीला दोन्ही कुटुंबे वाड्यात जमत. शेकोटी, आटवलेले दूध आणि जागरण. यंदा आशाताईंची मुलगी रीमा दोन दिवस आधीच वाड्यावर आली होती. मानसशास्त्राची अभ्यासक. माणसे काय बोलतात यापेक्षा ती कशी वागतात, यावर तिची नजर असे. आणि म्हणूनच तिला सोपान बुवा मुळीच आवडत नसत. गावोगावी कीर्तन-प्रवचन करणारे बुवा आशाताईंकडे कायमचे पाहुणे. व्यासपीठावर ते पहाटे उठण्याचे, साधेपणाचे, त्यागाचे गोडवे ...