- हृदयस्पर्शी कथा

तीन-चार वर्षांनी बदली ठरलेलीच.
त्यामुळे आमचे बालपण म्हणजे जणू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाणारे सरकारी भटकेपणच!
आज या गावात, उद्या त्या गावात...
एका घराशी मन जुळत नाही तोच दुसऱ्या घराची वाट धरायची.
पण काही ठिकाणे अशी असतात, की ती मागे पडली तरी मनातून कधीच दूर जात नाहीत.
असेच भटकता भटकता आम्ही खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे स्थिरावलो.
गावाच्या बाहेर, गिरणा नदीच्या काठावर साधारण पस्तीस सरकारी क्वार्टरची एक छोटीशी वसाहत होती. डोंगराच्या उंचवट्यावर वसलेली ती वसाहत सगळे ‘गिरणा-कॉलनी’ म्हणून ओळखायचे.
कॉलनीच्या तिन्ही बाजूंनी गिरणा नदी एखाद्या मायाळू मातेप्रमाणे वळसा घालत, खळखळत वाहत असे.
आजूबाजूला डोंगर, हिरवाई, मोकळी हवा आणि नदीच्या पाण्याचा नाद...
निसर्गाने जणू त्या वसाहतीला आपल्या कुशीत अलगद घेतले होते.
प्रत्येक क्वार्टरभोवती भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराच्या मागच्या प्रांगणात आईने एक छोटीशी बाग फुलवली होती.
चांदणी, मोगरा, जास्वंद, गुलाब, चमेली...
आणि रात्रीच्या शांततेत आपला सुगंध अलगद पसरवणारी रातराणी...
फुलांचा तो सुगंध घराच्या भिंतींवरच नाही, तर आमच्या बालपणाच्या आठवणींवरही कायमचा कोरला गेला.
वडील सकाळी लवकर ऑफिसला निघून जात. त्यामुळे सकाळच्या देवपूजेची जबाबदारी माझ्यावर असे.
आणि नेमकी त्याच वेळी...
आई तिच्या ओंजळीत फुले घेऊन यायची.
कधी मोगऱ्याचा शुभ्र सडा, कधी गुलाबाची लालसर पाकळी, कधी जास्वंदीचा टवटवीत रंग...
आईच्या ओंजळीत त्या वेळी फक्त फुले नसायची.
असायचा घरभर पसरलेला सुगंध...
असायचे मायेचे दोन थेंब...
असायची देवापुढे वाहिलेली श्रद्धा...
आणि असायचा आईच्या हातांचा स्पर्श.
देवघर फुलांनी सजायचे आणि संपूर्ण घर त्या सुगंधाने भारून जायचे.
मी आईला नेहमी एक प्रश्न विचारायचो,
“आई, ही फुलं एवढ्या लवकर का सुकतात गं?”
आई हसायची.
माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची,
“फुलं एकदा झाडापासून तोडली की त्यांचं आयुष्य संपतं रे... पण त्यांचा सुगंध ओंजळीत राहतो.”
तेव्हा तिच्या त्या शब्दांचा अर्थ मला कुठे कळायचा?
मी तिच्या हातात माझा हात ठेवायचो.
तिच्या ओंजळीतली फुले नाकाजवळ न्यायचो आणि तो सुगंध जणू सगळ्या शरीरात साठवून ठेवायचो.
कदाचित नकळत...
त्या क्षणांना मनाच्या ओंजळीत साठवत होतो.
काळ पुढे सरकत गेला.
गिरणा नदी वाहत राहिली...
फुलं उमलत राहिली...
ऋतू बदलत राहिले...
आणि आम्हीही मोठे होत गेलो.
पण आईच्या ओंजळीतील त्या फुलांचा सुगंध मात्र मनात तसाच राहिला.
एक दिवस मला पुन्हा आईच्या त्या वाक्याची आठवण झाली...
“फुलं तोडली की त्यांचं आयुष्य संपतं... पण त्यांचा सुगंध ओंजळीत राहतो.”
फरक एवढाच होता...
यावेळी फूल आई होती.
ज्या हातांनी आयुष्यभर घरासाठी फुलांचा सुगंध आणला,
ज्या हातांनी आमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला,
ज्या हातांनी घराला घरपण दिले...
ते हात एक दिवस कायमचे थांबले.
आई निघून गेली.
घरातली फुलं होतीच...
बागही होती...
गिरणा नदीही तशीच वाहत होती...
पण घराचा सुगंध हरवला होता.
तेव्हा जाणवलं...
माणसं जातात,
पण त्यांचं प्रेम जात नाही.
हात सुटतात,
पण हातांचा स्पर्श मनातून पुसला जात नाही.
आवाज थांबतो,
पण त्या आवाजाची हाक आयुष्यभर कानात घुमत राहते.
फुलं केवळ देवाच्या चरणी वाहण्यासाठी नसतात...
ती ओंजळीत जपण्यासाठी असतात.
क्षणभरासाठी का असेना,
त्यांचा सुगंध मनात भरून घेण्यासाठी असतात.
तशीच माणसंही...
ती केवळ आपल्या आयुष्यात येण्यासाठी नसतात.
ती आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी येतात.
आपल्याला प्रेम शिकवण्यासाठी येतात.
कुटुंबाला मायेच्या धाग्याने बांधून ठेवण्यासाठी येतात.
आणि मग एक दिवस...
ती आपल्यापासून दूर जातात.
ओंजळ रिकामी होते.
तेव्हा कळतं...
ओंजळीत आपण फुले धरली नव्हती...
आपण तर आपले संपूर्ण आयुष्यच धरून ठेवले होते.
आई गेल्यावर माझी ओंजळ रिकामी झाली...
पण तिचा सुगंध अजूनही तसाच आहे.
कधी मोगऱ्याच्या गंधात,
कधी जास्वंदीच्या रंगात,
कधी रातराणीच्या दरवळात...
आणि सर्वांत जास्त...
माझ्या आठवणींच्या ओंजळीत.
कदाचित म्हणूनच आजही फुलांचा सुगंध आला की मी क्षणभर थांबतो...
डोळे मिटतो...
आणि मनाच्या ओंजळीतून एक आवाज पुन्हा ऐकू येतो—
“फुलं सुकतात रे...
पण त्यांचा सुगंध कधीच मरत नाही.”
आईच्या ओंजळीतील ती फुले कधीच सुकली नाहीत...
कारण ती फुले नव्हतीच...
ती माझी आई होती.
.jpg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा