खूपसणीचा खेळ


आज जे वयाने चाळीशीच्या पुढे आहेत, त्यांना खूपसणीचा हा खेळ नक्कीच आठवत असेल.


आमच्या लहानपणी पाऊस पडला की आम्ही मित्रमंडळी एकत्र जमायचो. हातात सळईचा एक लोखंडी तुकडा घ्यायचा आणि पटांगणात किंवा गावाबाहेर जाणाऱ्या वाटेवर, वळणावळणाने ती सळई मातीमध्ये नेम धरून खुपसत पुढे जायचे.


असेच चालत किती किलोमीटर जायचो, हे आता आठवतही नाही. पण त्या खेळातून मिळणारा निखळ आनंद मात्र आजही मनात ताजा आहे.


ज्याचा नेम चुकला, सळई मातीमध्ये नीट खुपसली गेली नाही आणि खाली पडली, तर दुसरा मित्र तिथून तो डाव पुढे सावरायचा.


ना जिंकण्याची चिंता, ना हरण्याचे दुःख…


फक्त मित्रांची साथ आणि पावसाळी वातावरणात खेळण्याचा आनंद!


आज मागे वळून पाहताना जाणवते की, हे सारे खेळ आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. नवीन पिढीला तर त्यांची साधी ओळखही नाही.


सर्व ऋतूंचा मनमुराद आनंद घेणारे आमचे ते बालपण… त्यातील हा एक खास पावसाळी खेळ—खूपसणी!


पावसाळ्यात कागदाची होडी आपण पाण्यात सोडतो. ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जात राहते आणि एखाद्या वळणावर अचानक दिसेनाशी होते.


आयुष्यही अगदी तसेच आहे…


काळाच्या प्रवाहात बालपण पुढे निघून गेले आणि एका वळणावर हे पारंपरिक खेळही दिसेनासे झाले.


आजच्या मुलांच्या हातात महागडे मोबाईल आहेत, व्हिडिओ गेम्स आहेत; पण त्यांच्या हातातून सुगंधी मातीचा स्पर्श मात्र निसटला आहे.


आम्ही किलोमीटर चालूनही थकत नव्हतो. कारण आमच्या सोबत मित्रांचे हसणे होते, ओरडणे होते आणि एकमेकांची साथ होती.


आज विचार करताना वाटते, खूपसणीचा तो खेळ फक्त एक खेळ नव्हता.


सळई मातीमध्ये घट्ट रोवायची… कदाचित तो जीवन जगण्याचा एक धडाच होता.


परिस्थिती कशीही असो,

पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहायचे…


हेच कदाचित त्या मातीने आपल्याला शिकवले होते.


खेळ संपले…

बालपण संपले…

काळ पुढे निघून गेला…


आणि काळाच्या प्रवाहात बालपणही एका वळणावर दिसेनासे झाले.


पण आठवणी?


त्या अजूनही तिथेच आहेत…


खूपसणीचा खेळ आता मातीमध्ये खेळला जात नाही;

पण आठवणींच्या ओल्या मातीत त्याचा सुगंध आजही दरवळतो.




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट