अंकल


चाळिशी ओलांडलेल्या जवळपास प्रत्येक पुरुषाने हा शब्द आयुष्यात कधीतरी पहिल्यांदा ऐकलेला असतो...


आणि तो ऐकल्यावर मनावर होणारा अंतर्बाह्य परिणामही अनुभवलेला असतो!


राजेश आणि नीता यांची ही छोटीशी कथा म्हणजेच — “अंकल.”


खरं तर आज रविवार.

पण आजची सकाळ मात्र नेहमीसारखी नव्हती.


कधीही मॉर्निंग वॉकला न जाणारा राजेश आज चक्क मॉर्निंग वॉकला गेला होता.


आरशासमोर उभं राहून तो जणू स्वतःचे पांढरे केस मोजत होता.


एकदा केसांकडे पाहायचा...

मग कपाळाकडे...

मग पोटाकडे...


आणि शेवटी स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा —


“मी खरंच इतका म्हातारा दिसतोय का?”


कधीही रोज दाढी न करणारा राजेश आज मात्र गुळगुळीत दाढी करून आरशात स्वतःला न्याहाळत होता.


उठल्यापासून त्याची उगीचच चिडचिड सुरू होती.


मुलं अजून उठायची होती. रविवार असला तरी नीताची घरातली धांदल नेहमीसारखीच सुरू होती.


लग्नाला बावीस वर्षं झाली होती, त्यामुळे राजेशच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव नीता अगदी सहज वाचत होती.


चहाचे कप घेऊन ती शांतपणे डायनिंग टेबलजवळ येऊन बसली.


चहा घेता घेता तिने एक हात त्याच्या हातावर ठेवला आणि विचारलं,


“काय झालंय? सांगणार का मला?”


तो जरा शांत झाला; पण चेहऱ्यावरचा वैताग स्पष्ट दिसत होता.


नीताने पुन्हा विचारलं,


“काय झालंय ते तरी सांगा. काल ड्युटीवरून आल्यापासून सारखी चिडचिड चाललीये. ऑफिसमध्ये काही झालं का? मुलं उठायच्या आत सांगून टाका... आत्ता आपण दोघंच आहोत.”


राजेशने कप खाली ठेवला.


दोन क्षण शांत राहिला.


आणि मग गंभीर चेहऱ्याने विचारलं,


“मला खरं खरं सांग... मी म्हातारा दिसायला लागलोय का?”


खरं तर नीताला हसूच आलं.


पण तिने स्वतःला सावरलं.


“छे छे! तुम्ही तर माझे शाहरुख आहात!”


राजेशच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधान उमटलं.


पण नीता पुढे म्हणाली,


“फरक एवढाच... शाहरुखचं पोट सुटलेलं नाही!”


राजेशने तिच्याकडे रागाने पाहिलं.


“अहो, सॉरी!” ती हसत म्हणाली. “सांगा, नक्की काय झालं?”


राजेशने दीर्घ श्वास घेतला.


“मी जिन्याने फोनवर बोलत घरी येत होतो... तर ती बर्वेंची मुलगी मला म्हणाली —”


तो थांबला.


नीता म्हणाली,


“मग?”


राजेशने तिच्याकडे पाहत जड आवाजात सांगितलं,


“‘अंकल... साईड द्या ना!’”


क्षणभर घरात शांतता पसरली.


नीताला मात्र आता सगळं समजलं होतं.


प्रॉब्लेम ‘साईड’चा नव्हता...

प्रॉब्लेम ‘अंकल’चा होता!


ती हसणं आवरत म्हणाली,


“अहो, जाऊ द्या. अल्लड आहे अजून. तुम्ही तो विचार सोडा आणि आधी मुलं उठायच्या आत नाक्यावरून भाजी आणून द्या.”


असं म्हणत तिने पिशवी आणि पैसे त्यांच्या हातात दिले.


राजेशने चपला घातल्या आणि रागारागाने घराबाहेर पडला.


तो लिफ्टकडे जात असताना त्याच्या मनात एकच विचार चालू होता —


“अंकल म्हणायचं म्हणजे काय? मी एवढा म्हातारा दिसतो का?”


तेवढ्यात नीताच्या लक्षात आलं —


अरे देवा! दूधही संपलंय!


ती पटकन धावत लिफ्टजवळ गेली.


लिफ्टमध्ये बापट दांपत्य आणि तीच बर्वेंची मुलगी होती.


नीताला पाहून राजेश लिफ्टमध्ये थांबला.


नीताने त्याला अजून एका कामाची यादी सांगितली.


“भाजी... दूध... आणि हो, कोथिंबीर विसरू नका!”


राजेशने मान हलवली.


तेवढ्यात नीताची नजर बर्वेंच्या मुलीकडे गेली.


तिला हसू आलं.


पण ती हसली नाही.


फक्त राजेशला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात मिश्कीलपणे म्हणाली —


“अंकल... दूध आठवणीनं आणा हं!”


लिफ्टमध्ये एक क्षण शांतता.


बर्वेंची मुलगी नीताकडे पाहू लागली.


बापट दांपत्याने एकमेकांकडे पाहिलं.


आणि राजेश...


राजेशने नीताकडे अशी नजर टाकली की, त्या नजरेत “घरी आल्यावर बघतो तुला!” हा संदेश स्पष्ट होता.


नीता मात्र त्याच्याकडे न बघताच पटकन घरात आली.


दार बंद केलं.


आणि मग मात्र तिला राहवलं नाही.


ती पोट धरून हसू लागली.


पण हसता हसता ती जरा अंतर्मुख झाली.


किती गंमतीशीर आहे ना माणसाचा स्वभाव!


मनाला न पटणारी कुठलीही गोष्ट स्वीकारायला त्याला नेहमीच त्रास होतो.


विशेषतः...


वय!


खरं तर राजेश एक गोष्ट सोयीस्करपणे विसरत होता —


बर्वेंची मुलगी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती.


आणि आपली ईशा?


कॉलेजच्या पहिल्या वर्षाला!


‘आँटी’ ही हाक पहिल्यांदा ऐकली तेव्हा नीतालाही जरा चुकल्यासारखं वाटलं होतं.


पण तिने ते हसून स्वीकारलं.


कारण तिला एक गोष्ट समजली होती —

निसर्गाचे दान स्वीकारायचे असते

आणि 

प्रत्येक वयात त्या वयाचा आनंद घ्यायचा असतो.

राजेश ला मात्र त्रास होत होता

तो एक गोष्ट विसरला होता


आपली मुलंही कुणाला तरी “अंकल” आणि “आंटी” म्हणतच असतीलच!


आपणास देखील 

अंकल ऑंटी 

ही हाक प्रथम कोणी दिली 

कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा

😄



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट