दुर्लक्षित


कुटुंबातील सगळ्यात ज्येष्ठ—आप्पा.


मुलांनी हौसेने बांधलेल्या त्या टोलेजंग बंगल्याच्या प्रशस्त व्हरांड्यात आप्पा आपल्या जुन्या लाकडी आरामखुर्चीत निवांत रेलून बसले होते.


डोळे मिटलेले…


चेहऱ्यावर नेहमीसारखंच शांत भाव…


पण मन?


मन मात्र कुठल्याशा वादळात सापडलं होतं.


आरामखुर्ची संथ लयीत पुढे-मागे होत होती.

आणि त्या खुर्चीच्या प्रत्येक हेलकाव्यासोबत आप्पांच्या मनातले विचारही मागे-पुढे होत होते.


कधी भूतकाळात…


कधी वर्तमानात…


आणि कधी स्वतःलाच न समजणाऱ्या भविष्याच्या विचारात…


मागच्याच पंधरवड्यात आप्पांची पंचाहत्तरी मोठ्या थाटामाटात पार पडली होती.


मुलांनी आणि सुनांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती. नातेवाईक, मित्रमंडळी, समाजातील मान्यवर—सगळे आले होते.


कौतुकाचे शब्द झाले.


फुलांचे हार पडले.


शुभेच्छांचा वर्षाव झाला.


“आप्पांनी आयुष्य खूप कष्टाने उभं केलं…”


“आप्पांसारखा कुटुंबाचा आधार असणं म्हणजे भाग्य…”


“आप्पांचा आदर्श घ्यावा…”


असं बरंच काही बोललं गेलं.


आप्पा सगळं ऐकत होते.


हसत होते.


मान डोलवत होते.


पण त्या दिवशी रात्री सगळे झोपल्यानंतर मात्र आप्पांना झोप आली नव्हती.


का कुणास ठाऊक…


इतका मोठा सोहळा झाला होता…


सगळ्यांनी आपल्यावर प्रेम केलं होतं…


तरीही मनाच्या  गाभाऱ्यात काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं.


नेमकं काय?


त्यांना स्वतःलाही उमगत नव्हतं.


आज व्हरांड्यात बसल्यावर पुन्हा तोच प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला.


आणि मग…


डोळ्यांसमोर आयुष्याचा पट हळूहळू उलगडू लागला.


आई-वडिलांच्या पश्चात दोन बहिणींची लग्नं केली.


दोन धाकट्या भावांची जबाबदारी स्वीकारली.


स्वतःच्या संसाराला आकार देताना कधी स्वतःच्या सुखाचा हिशेब केला नाही.


दिवस-रात्र कष्ट केले.


कधी पैशाची चिंता…


कधी घराची…


कधी भावंडांची…


कधी मुलांच्या शिक्षणाची…


एक-एक जबाबदारी खांद्यावर घेत घेत आयुष्याची पंचाहत्तरी कधी आली, हे त्यांनाही कळलं नाही.


आज दोन मुलगे होते—


एक डॉक्टर…


दुसरा इंजिनिअर…


सुना, नातवंडं, प्रशस्त बंगला, सुखसोयी…


समाजात मान…


नातेवाईकांत आदर…


आयुष्याच्या हिशेबात आप्पांकडे कमी काय होतं?


काहीच नाही.


पण मनाच्या हिशेबात मात्र…


काहीतरी कमी होतं.


अचानक आप्पांच्या मनात एक विचार आला—


“आपण एवढं सगळं केलं…


पण आता आपली गरज आहे का कुणाला?”


क्षणभर त्यांनी तो विचार झटकून टाकला.


“नाही… नाही…”


मनाला समजावत ते स्वतःशीच म्हणाले—


“मुलं आपलीच आहेत. त्यांना आपली काळजी आहे.”


पण लगेच दुसरा आवाज मनातून आला—


“काळजी आहे…


पण तुझ्या मताची गरज आहे का?”


आप्पा अस्वस्थ झाले.


आरामखुर्चीचा वेग नकळत वाढला.


घरात आजही त्यांचं म्हणणं ऐकलं जात होतं.


पण…


मान्य केलं जात होतं का?


आप्पा काही सांगू लागले की सगळे—


“हो आप्पा…”


“हो, बघू…”


“तुमचं म्हणणं खरं आहे…”


असं म्हणत.


पण आप्पांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच कुणीतरी दुसरा विषय काढायचा.


कधी मोबाईलमध्ये पाहायचं.


कधी कामाचं कारण सांगायचं.


कधी “आता काळ बदललाय आप्पा…” असं हसत म्हणायचं.


आप्पा गप्प व्हायचे.


पूर्वी त्यांच्या एका शब्दावर घरात निर्णय व्हायचे.


आता त्यांच्या एका शब्दावर…


फक्त चर्चा होते.


कुळधर्म, कुळाचार, सण-समारंभ अजूनही होत होते.


पण त्यातही त्यांच्या जुन्या पद्धतीपेक्षा आधुनिक सोयीची झालर अधिक दिसत होती.


आप्पांना सगळं समजत होतं.


पण ते बोलत नव्हते.


कारण त्यांना भीती होती—


“आपण बोललो तर जुनाट म्हणतील…”


“आप्पांना आता काळ कळत नाही…”


“सगळं आपल्या पद्धतीनेच व्हायला हवं, असं त्यांना वाटतं…”


हे ऐकण्यापेक्षा गप्प राहणं त्यांना सोपं वाटत होतं.


पण गप्प राहणं सोपं असतं का?


नाही.


शब्द ओठांवर येऊन थांबले की मनात त्यांचा आवाज आणखी मोठा होतो.


आप्पांच्या मनातही तेच होत होतं.


त्यांना मुलांवर राग नव्हता.


सुना वाईट आहेत असंही त्यांना वाटत नव्हतं.


उलट…


“माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य जगावं,”


हीच तर त्यांची आयुष्यभराची इच्छा होती.


मग आज मनाला एवढं का लागावं?


आप्पांनी स्वतःलाच प्रश्न केला.


उत्तर मात्र मिळत नव्हतं.


कदाचित त्यांना निर्णयांमध्ये आपलं स्थान हवं होतं.


कदाचित कुणीतरी मनापासून विचारावं—


“आप्पा, तुम्हाला काय वाटतं?”


एवढीच अपेक्षा होती.


त्यांना अधिकार नको होता…


फक्त आपलेपणा हवा होता.


त्यांना आपलं म्हणणं लादायचं नव्हतं…


फक्त आपलं म्हणणं ऐकलं जावं, एवढंच हवं होतं.


आणि कदाचित म्हणूनच मन दुखत होतं.


तेवढ्यात आतून सुनबाईचा प्रेमळ आवाज आला—


“आप्पा… चहाला येत आहेत ना?”


आप्पांनी डोळे उघडले.


समोरचा बंगला उन्हात चमकत होता.


ज्या घरासाठी त्यांनी आयुष्यभर स्वप्नं पाहिली होती…


ज्या मुलांसाठी स्वतःच्या कितीतरी इच्छा बाजूला ठेवल्या होत्या…


तेच घर आज त्यांच्या डोळ्यांसमोर होतं.


घर सुंदर होतं.


घर भरलेलं होतं.


पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात मात्र…


एकटेपणा घर करून बसला होता.


आप्पा हळूहळू आरामखुर्चीतून उठले.


दोन पावलं पुढे गेले…


पुन्हा थांबले.


क्षणभर मागे वळून त्या आरामखुर्चीकडे पाहिलं.


जणू ती खुर्चीही त्यांना काहीतरी विचारत होती—


“आप्पा, तुम्ही थकला आहात का?”


आप्पांच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं.


आणि मनात उत्तर आलं.


“शरीर थकलं असतं तर आराम केला असता…

मन थकलंय, त्याला कुठे विसावा द्यायचा?”


आप्पा आत गेले.


चेहऱ्यावर पुन्हा तेच शांत हसू होतं.


घरच्यांना काहीच जाणवलं नाही.


पण आप्पांच्या मनात एक वाक्य सतत घुमत होतं—


“आपण उपेक्षित नाही…

आपण दुर्लक्षित आहोत.”


उपेक्षित माणसाला आपली जागा नसते.


पण दुर्लक्षित माणसाला?


जागा असते…


घर असतं…


माणसं असतात…


आपलेपणाची नावंही असतात…


फक्त त्याच्या मनाचा आवाज ऐकणारा कुणी नसतो.


आप्पा चहाचा कप हातात घेऊन शांत बसले.


सगळे नेहमीसारखे बोलत होते.


आप्पाही हसत होते.


पण मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उठत होता—


“ मनात उठणाऱ्या विचारांना आता दुर्लक्षित कसं करायचं?”


आपल्याजवळ तरी आहे याचे उत्तर......????





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट