हृदयस्पर्शी कथा
वेळ विकणारा म्हातारा...
पुण्यातील बालगंधर्व मंदिराच्या मागे, जंगली महाराज रोडवर संभाजी उद्यानाच्या फुटपाथवर एक म्हातारा रोज येऊन बसायचा.
त्याच्यासमोर एक छोटीशी पाटी असायची—
“येथे वेळ विकत मिळेल...
पंधरा मिनिटे — फक्त पन्नास रुपये!”
रस्त्यावरून जाणारे अनेकजण ती पाटी वाचायचे, क्षणभर थांबायचे आणि हसत पुढे निघून जायचे.
“वेळ काय बाजारात मिळणारी भाजी आहे का विकायला?” असा सूर प्रत्येकाचा असायचा.
“वेळ कुठे विकत मिळतो का?”
पण गेल्या आठ दिवसांपासून डेक्कनकडे जाणारा गौतम मात्र ती पाटी रोज पाहत होता.
गौतम एक आयटी इंजिनिअर होता.
तासाला पाच हजार रुपये कमावणारा.
पुण्यात मॉडेल कॉलनीत स्वतःचा बंगला, आलिशान कार, इंजिनिअर पत्नी... आई-वडील निवृत्त शिक्षक... आयुष्यात हवे ते सगळे त्याच्याकडे होते.
पण एक गोष्ट नव्हती...
वेळ!
दिवसाचे चोवीस तासही त्याला कमी पडत होते.
ऑफिस, मीटिंग्ज, टार्गेट्स, ई-मेल्स, फोन कॉल्स...
शनिवार-रविवारही मित्रांसोबत पार्टी, आऊटिंग किंवा एखादी व्यावसायिक भेट.
शरीराला विश्रांती नव्हती आणि मनाला तर उसंतच नव्हती.
त्या म्हाताऱ्याची पाटी पाहून तो मनातल्या मनात हसायचा.
“पन्नास रुपयांत पंधरा मिनिटे? काय मूर्खपणा
पंधरा मिनिटे वेळ विकतो म्हणे!
असं काय विकणार आहे हा म्हातारा?”
एक दिवस मात्र
त्या दिवशी ऑफिसमधील एका प्रचंड तणावपूर्ण बैठकीनंतर गौतमचे डोके भणभणत होते. गाडी चालवताना अचानक त्याचे लक्ष त्या फुटपाथकडे गेले. त्याने गाडीचा ब्रेक दाबला.
गाडी थांबवली.
तो खाली उतरला.
म्हाताऱ्यासमोर गेला आणि खिशातून पन्नास रुपयांची नोट काढत म्हणाला,
“बाबा... हे घ्या पन्नास रुपये.
आणि द्या मला पंधरा मिनिटे.”
म्हातारा हसला.
त्याने पैसे घेतले आणि शांतपणे विचारले,
“कशासाठी हवीत तुला पंधरा मिनिटे?”
गौतम क्षणभर गप्प राहिला.
मग तो बोलू लागला...
“मी गौतम परांजपे.
आयटी इंजिनिअर आहे.
सात वर्षे झाली सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय. आतापर्यंत पाच कंपन्या बदलल्या.
मोठं पॅकेज आहे.
पुण्यासारख्या शहरात स्वतःचा बंगला आहे.
कार आहे.
बायकोसुद्धा इंजिनिअर आहे.
आई-वडील निवृत्त शिक्षक आहेत...”
बोलता बोलता गौतमला स्वतःलाच जाणवले—
आज तो कित्येक दिवसांनी कॉम्प्युटरची भाषा सोडून आपल्या मातृभाषेत, मनापासून आणि मोकळेपणाने बोलत होता.
त्याने घड्याळाकडे पाहिले.
पंधरा मिनिटे संपली होती.
तो उठणार इतक्यात म्हाताऱ्याने हातानेच त्याला थांबवले.
पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले.
तो म्हणाला,
“एक प्रश्न विचारू?”
गौतमने मान हलवली.
“आईशी शेवटचं कधी बोललास?”
गौतम उत्तर देणार, तेवढ्यात दुसरा प्रश्न आला—
“वडिलांच्या शेजारी शेवटचं कधी निवांत बसलास?”
गौतम गप्प.
म्हातारा पुढे म्हणाला,
“आई-वडिलांना आणि बायकोला घेऊन शेवटचं नाटक किंवा सिनेमा कधी पाहिलास?”
आता मात्र गौतमच्या डोळ्यांसमोर त्याचा भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा फिरू लागला.
इंजिनिअर होण्यापूर्वीचे दिवस...
परिस्थिती साधी होती.
पण आईजवळ आवडीच्या पदार्थासाठी केलेला हट्ट किती श्रीमंत होता, हे आज त्याला जाणवत होते.
वडिलांसोबत याच संभाजी उद्यानातील बाकावर बसून केलेल्या गप्पा...
पुण्याच्या इतिहासापासून आपल्या घराण्याच्या जुन्या आठवणींपर्यंत रंगलेल्या त्या निवांत चर्चा...
वडिलांचा हात हातात घेऊन चाललेले ते दिवस...
सगळं आठवत होतं.
पण आता?
आईजवळ बसून निवांत पाच मिनिटे बोलूनही चार वर्षे झाली होती.
वडिलांशी मनापासून गप्पा मारण्याची तर त्याला आठवणही नव्हती.
मोठं घर होतं...
पण घरात वेळ नव्हता.
पैसा होता...
पण माणसांसाठी क्षण नव्हता.
सुखसोयी होत्या...
पण सहवास नव्हता.
गौतमच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
पंधरा मिनिटांसाठी पन्नास रुपये देऊन आलेला तो माणूस, त्या पंधरा मिनिटांत स्वतःचाच हरवलेला चेहरा शोधत होता.
म्हातारा शांत बसला होता.
गौतम बोलत राहिला...
बोलत राहिला...
आणि बोलता बोलता एक तास कधी निघून गेला, त्यालाच कळलं नाही.
अचानक तो भानावर आला.
त्याने खिशातून पैसे काढले.
“बाबा... हे तुमचे अजून पंचेचाळीस मिनिटांचे पैसे.”
म्हातारा मंद हसला.
“नको.”
“का?”
म्हातारा म्हणाला,
“पहिले पन्नास रुपये माझ्या विक्रीचे होते.
पण उरलेली पंचेचाळीस मिनिटे तू माझ्या दुकानातून विकत घेतली नाहीस...
ती तू तुझ्याच आयुष्यात शोधलीस.
आणि दुसऱ्याने स्वतःचा हरवलेला वेळ शोधून काढला, त्याचे पैसे मी कसे घेऊ?”
गौतम काहीच बोलला नाही.
त्याने त्या म्हाताऱ्याच्या पाया पडून नमस्कार केला.
आज त्याला पहिल्यांदा जाणवलं होतं—
आपण वेळ कमवत आलो...
पण जगणं हरवत गेलो.
तो गाडीकडे वळला.
फुटपाथवरच गजरे विकणारी एक बाई बसली होती.
त्याने दोन गजरे घेतले.
एक बायकोसाठी...
आणि एक आईसाठी.
पुढे चितळ्यांच्या दुकानातून आईच्या आवडीचे श्रीखंड आणि बाबांच्या आवडीची काजू कतली घेतली.
गाडी सुरू केली.
पण आज नेहमीप्रमाणे त्याने गाडीच्या काचा बंद केल्या नाहीत.
खिडकीतून येणारा वारा चेहऱ्यावर घेत तो शांतपणे गाडी चालवत होता.
आज त्याच्या गाडीचा वेग कमी होता...
पण आयुष्य पहिल्यांदाच योग्य दिशेने धावत होतं.
आज तो आपल्या कुटुंबासाठी काही वस्तू घेऊन जात नव्हता...
तो त्यांच्यासाठी आपला ‘वेळ’ घेऊन घरी जात होता.
आणि कदाचित...
त्या म्हाताऱ्याच्या फुटपाथवरील छोट्याशा दुकानातून आज त्याने आयुष्यातली सर्वात महागडी आणि सर्वात मौल्यवान गोष्ट विकत घेतली होती—
“वेळ...”
कारण पैसा पुन्हा कमावता येतो...
हरवलेली संपत्ती पुन्हा मिळवता येते...
पण
“पैशाने आपण जगातील सर्वात महागडे घड्याळ विकत घेऊ शकतो... पण त्यात चालणारा
‘वेळ’ आणि ‘माणसे’ कधीच विकत घेता येत नाहीत.”
.jpg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा