व्यक्ती चित्र
रंग्या...
चौधरी सरांचा वर्ग सुरू होता...
वर्गात नेहमीची शांतता होती. चौधरी सर शिकवत होते आणि आम्ही सगळे आपापल्या वहीत काहीतरी लिहिण्याचा आव आणत होतो. पण आमच्या वर्गात एक असा विद्यार्थी होता, ज्याच्यासाठी शाळा म्हणजे केवळ शिकण्याची जागा नव्हती; शाळा म्हणजे त्याच्यासाठी जगण्याचा अनुभव होता.
तो म्हणजे—रंग्या!
रंग्या म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व!
शाळेवर त्याचे इतके प्रेम होते की, प्रत्येक वर्गात दोन-तीन वर्षे मुक्काम करूनच तो पुढील वर्गात जायचा. आम्ही वर्ग बदलायचो; पण रंग्या मात्र आपल्या वर्गाशी एकनिष्ठ राहायचा!
रांगडा गडी... धिप्पाड शरीरयष्टी... चेहऱ्यावर कायम बेफिकीर भाव.
शिक्षक वर्गातून बाहेर पडले की शाळेच्या आवारात रंग्याचीच हुकूमत असायची. त्याच्या परवानगीशिवाय तिथे पानही हलत नसे—अशी त्याची दहशत!
शाळेत शिक्षकांकडून आम्ही अभ्यासक्रमातील विषय शिकायचो; पण अभ्यासक्रमाबाहेरचे काही विषय रंग्याने आम्हाला शिकवले.
बिडी कशी प्यायची...
नाकातून धूर कसा सोडायचा...
आगपेटी नसताना दोन काड्यांच्या मदतीने बिडी कशी पेटवायची...
लोखंडी खांबावर किंवा फरशीवर काडी घासून अग्नी कसा प्रज्वलित करायचा
या सगळ्या विषयांचा रंग्या म्हणजे आमचा प्रात्यक्षिक शिक्षक!
अर्थात, आज मागे वळून पाहताना त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या. पण त्या वयात रंग्या म्हणजे आमच्यासाठी शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेरचे एक स्वतंत्र विद्यापीठच होते!
एके दिवशी चौधरी सरांनी वर्गात गृहपाठ दिला.
दुसऱ्या दिवशी वही तपासण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
एकेक विद्यार्थी सरांच्या टेबलासमोर जात होता.
गृहपाठ पूर्ण असेल तर कौतुक...
नसेल तर छडी!
हळूहळू रंग्याची वेळ जवळ आली.
आम्हाला त्याच्या वहीबद्दल काहीच शंका नव्हती.
कारण रंग्याची वही म्हणजे वहीच्या नावाखाली कोरं पान!
रंग्या सरांच्या टेबलाजवळ पोहोचला.
सरांनी वही उघडली...
आणि वही पाहताच त्यांचा चेहरा लाल झाला.
एकही अक्षर नाही!
चौधरी सरांनी छडी हातात घेतली.
“रंग्या, हात पुढे कर!”
वर्गात शांतता पसरली.
रंग्याचे दोन्ही हात मात्र पँटच्या खिशात होते.
खिशात हातांची चुळबूळ सुरू होती.
आम्हाला वाटले—आता रंग्याची धुलाई ठरलेली!
सर पुन्हा ओरडले,
“हात बाहेर काढ!”
रंग्याने अगदी निर्धाराने एक हात खिशातून बाहेर काढला...
सरांचा हात पकडला...
आणि त्यांच्या हातावर अलगद पन्नास पैशांचे नाणे ठेवले!
क्षणभर चौधरी सरही अवाक् झाले.
रंग्या अगदी निरागस चेहऱ्याने म्हणाला,
“सर... हे पन्नास पैसे ठेवा, पण मला मारू नका!”
बस्स!
वर्गात असा हशा पिकला की काही मुलं बाकावर डोकी आपटून हसू लागली.
चौधरी सरांचा राग मात्र आभाळाला भिडला.
“गधड्या!”
सर गरजले,
“आतापासून लाच देतोस काय? मोठेपणी काय होणार आहेस?”
रंग्या काहीच बोलला नाही.
फक्त खाली मान घालून उभा राहिला.
त्या दिवशी चौधरी सरांचे ते शब्द आमच्या मनावर कोरले गेले.
“मोठेपणी काय होणार आहेस.
काळ पुढे गेला...
आम्ही शाळा सोडली.
कोणी डॉक्टर झाला...
कोणी इंजिनियर...
कोणी शिक्षक...
कोणी व्यवसायात गेला...
आम्ही आपापल्या संसारात रमलो.
आणि रंग्या?
ज्याच्या भविष्याची काळजी कधीकाळी चौधरी सरांना वाटत होती, त्या रंग्यानेच पुढे चौधरी सरांच्या मुलाच्या भविष्याला दिशा दिली.
आपल्या बँकेत त्यांच्या मुलाला नोकरीची संधी देऊन त्याने त्याच्या आयुष्याला आधार दिला.
पण रंग्याचे शाळेवरचे प्रेम मात्र कधीच कमी झाले नाही.
ज्या शाळेच्या आवारात कधीकाळी त्याची हुकूमत चालायची, त्याच शाळेची जबाबदारी आज त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे.
आज तो आमच्या शाळेचा संस्थाचालक आहे.
पंचक्रोशीत राजकारणात त्याचे मोठे नाव आहे.
ज्याला आम्ही कधीकाळी गंमतीने “रंग्या” म्हणायचो...
तोच आज आमच्यासाठी आदरार्थी
“रंगराव आप्पा”
झाला आहे.
.jpg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा