फुंकर


बालपण म्हणजे निरागसतेचं एक सुंदर विश्व...

आणि त्या विश्वात प्रत्येकाच्या वाट्याला येणारा एक हळवा क्षण असतोच.


खेळता खेळता दाराच्या फटीत बोट सापडतं, धावता धावता गुडघा खरचटतो, अनवधानाने एखादा दगड पायाला रुततो... आणि क्षणार्धात वेदनेची कळ काळजाचा ठाव घेते. डोळ्यांच्या कडा ओलावतात, ओठ थरथरतात.


आसपास कुणी नसेल, तर इवलंसं मन स्वतःच स्वतःला सावरतं. दुखरं बोट अलगद हातात घेतं, वाहणारे अश्रू पुसतं आणि नकळत ओठ त्याजवळ नेतं...


“फु... फु... फु...”


ती छोटीशी फुंकर म्हणजे कोवळ्या वयात स्वतःचं दुःख स्वतः पेलण्याची पहिली शिकवण असते.


पण दुःख मोठं झालं आणि आपली हाक कुणाच्या कानावर गेली, की आई, आजी किंवा काकू धावत येते.


आई तो इवलासा हात आपल्या ओंजळीत घेते. जखम पाहते आणि अलगद म्हणते—


“काही नाही रे... आता बरं वाटेल.”


आणि जखमेवर उमटते... मायेची तीच जादुई फुंकर.


कधी पदराचा मऊ बोळा जखमेवर टेकवला जातो, कधी डोक्यावरून हात फिरतो. ना औषध, ना मलम... तरी वेदना कमी झाल्यासारखी वाटते.


जखम तिथेच असते; पण तिचं दुःख वाटून घेणारं कुणीतरी जवळ आलेलं असतं.


खरं तर ती फुंकर जखमेवर नसतेच...

ती मनावर असते.


त्या फुंकरित आईची माया असते, आजीच्या हातातली ऊब असते, काकू-मावशीच्या काळजीची आपुलकी असते. म्हणूनच बोटावरची जखम भरून जाते, खरचटलेला गुडघा विस्मरणात जातो...


पण त्या मायेचा स्पर्श मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमचा साठून राहतो.


काळ पुढे सरकतो.


बालपण मागे पडतं. हातातली खेळणी सुटतात आणि हातात जबाबदाऱ्या येतात. दुखरं बोट घेऊन धावत आईकडे जाणारं ते मूल मोठं होतं.


मग जखमा दिसेनाशा होतात...

पण होतात मात्र मनाच्या.


कुणाच्या शब्दांनी, कुणाच्या वागण्याने, कुणाच्या दुर्लक्षाने एखादं मन आतून दुखतं. चेहऱ्यावर हसू असतं; पण मनाच्या कोपऱ्यात वेदना दडलेल्या असतात.


अशावेळी औषधाची गरज नसते.


कधी दोन प्रेमळ शब्द पुरतात.

कधी शांतपणे ऐकून घेणं पुरतं.

कधी खांद्यावर ठेवलेला हात पुरतो.


कधी फक्त एवढंच म्हणणं पुरतं—


“मी आहे... काळजी करू नकोस.”


हीसुद्धा एक फुंकरच असते.


बालपणी आपली जखम आईच्या फुंकरिने शांत व्हायची; मोठेपणी कुणाच्या तरी मनावरची जखम शांत करण्याची वेळ आपली असते.


म्हणून आयुष्याच्या या धावपळीत थोडं थांबूया...


कुणाच्या डोळ्यांतलं न बोललेलं दुःख ओळखूया.

कुणाच्या मनाला आधार देऊया.

कुणाच्या वेदनेवर प्रेमाची एक हलकीशी फुंकर घालूया.


कारण जखमा देणारे हात आयुष्यात खूप भेटतात...


पण जखमेवर फुंकर घालणारे हात बनणं

हीच कदाचित माणूस म्हणून जगण्याची खरी खूण आहे.


एक छोटीशी विनंती… 

मित्रांनो,

माझ्या कथा आणि लेख आवडल्याचे अनेक मित्र मला व्यक्तिगत WhatsApp किंवा मोबाईलवरून आवर्जून कळवत असतात. तुमचे हे प्रेम आणि प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत.

मात्र, तुम्हाला एखादी कथा किंवा लेख आवडला असेल, तर कृपया Gmail अकाउंटने लॉगिन करून ब्लॉगच्या Comment Box मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा.

तुमच्या दोन शब्दांच्या प्रतिक्रिया मला पुढे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देतील.

आपला स्नेह असाच कायम राहू द्या.

मनःपूर्वक धन्यवाद! 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट