छोट्याशा चाळीत त्यांनी आपला संसार थाटला होता.
ते दोघे आणि त्यांची दोन चिमुरडी मुले—चिंगी आणि पिंट्या.
दोन वेळच्या जेवणासाठी दिवसभर संघर्ष करणारे ते कुटुंब. शिक्षण फारसे झालेले नव्हते. त्यामुळे मिळेल ते काम करायचे आणि त्यातून संसाराचा गाडा पुढे ढकलायचा, एवढेच त्यांचे आयुष्य.
गणपती जवळ आला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी रस्त्याच्या कडेला एक कोपरा पकडला आणि गणपतीच्या सजावटीचे साहित्य विक्रीसाठी मांडले.
छोटे लाकडी पाट, विविध रंगांचे कापड, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, पाण्यावर तरंगणारे दिवे आणि मागे लावण्यासाठी रंगीबेरंगी छापील पडदे...
सकाळी सात वाजता सुरू होणारा त्यांचा व्यवसाय रात्री अकरा वाजेपर्यंत चालायचा.
दिवसभर नवरा-बायको दोघेही रस्त्याच्या कडेला बसून ग्राहकांची वाट पाहायचे.
पण त्याच वेळी त्यांच्या छोट्याशा घरात दोन चिमुरड्यांची वेगळीच धावपळ सुरू होती.
“ताई...”
“काय रे पिंट्या?”
“आपण कधीच गणपती बसवत नाही ना?”
चिंगी काही क्षण शांत राहिली.
“अरे, आई-बाबांना वेळ नसतो ना... आणि आपल्याकडे गणपती आणायला पैसेही नसतात.”
पिंट्या थोडा विचार करून म्हणाला,
“ताई, आपण गणपतीसाठी पैसे जमवले तर?”
चिंगीच्या डोळ्यांत चमक आली.
भावाची कल्पना तिला मनापासून आवडली.
त्यांच्या घराच्या शेजारीच रस्त्याच्या कडेला एका काकांचे गणपती विक्रीचे दुकान होते.
दोघेही धावत काकांकडे गेले.
“काका... आम्हाला काहीतरी काम द्या ना.”
काकांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.
“तुम्ही? काय काम करणार?”
“काका, तुम्ही सांगा. आम्ही काहीही काम करू.”
चिंगीच्या आवाजात उत्साह होता.
“आम्हालाही यावर्षी गणपती बसवायचा आहे.”
काकांना त्यांची निरागस गंमत वाटली.
ते हसले.
“बरं... एक काम कराल?”
“हो!”
दोघांनी एकदम उत्तर दिले.
“माझे पाच गणपती विकून दाखवा. पाच मूर्ती विकल्या तर मी तुम्हाला एक छानसा गणपती देईन... आणि वरून पैसेही देईन.”
दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
क्षणाचाही विलंब न करता चिंगी आणि पिंट्या गणपतीच्या मूर्ती घेऊन रस्त्याच्या कडेला बंद दुकानाच्या पायरीवर जाऊन बसले.
“गणपती घ्या... गणपती!”
छोटीशी चिंगी मोठ्या उत्साहाने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना गणपती घेण्याचा आग्रह करू लागली.
“काका, गणपती घ्या ना!”
“मावशी, हा बघा किती छान आहे!”
“काका, हा घ्या... तुमच्या घरात बाप्पा छान दिसेल!”
तिचा तो निरागस आग्रह पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत होते.
हे सगळे काही अंतरावर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या आपल्या गाडीत बसून शेखर पाहत होता.
त्याची पत्नी निशा गणपतीच्या खरेदीसाठी आतल्या रस्त्यावर गेली होती.
अचानक चिंगीचे लक्ष गाडीत बसलेल्या शेखरकडे गेले.
ती हातात गणपतीची मूर्ती घेऊन धावतच त्याच्या गाडीपाशी आली.
“काका... गणपती घ्या ना!”
शेखरने काच खाली केली.
“अगं, दाखव पाहू.”
चिंगीने मूर्ती पुढे केली.
“अहो, खूप छान आहे. आणि मी स्वस्तात देत आहे.”
तिच्या डोळ्यांतली कळकळ आणि चेहऱ्यावरचा आर्जव पाहून शेखर क्षणभर भावूक झाला.
“कितीला दिलास?”
चिंगीच्या चेहऱ्यावर लगेच व्यापाऱ्याचा उत्साह आला.
“हा छोटा आहे ना... फक्त दोनशे तीस रुपये.”
तिने दुसरी मूर्ती पुढे केली.
“आणि हा मोठा. मोरावर बसलेला. हा फक्त चारशे तीस रुपयांना.”
क्षणभर थांबून ती आत्मविश्वासाने म्हणाली,
“काका, तुम्ही दुसऱ्या दुकानात विचारून बघा. हा तुम्हाला सहाशे रुपयांच्या खाली कुणीच देणार नाही!”
शेखरला आता तिची गंमत वाटत होती.
त्याने खिशातून चारशे तीस रुपये काढले.
“बरं, हा दे.”
चिंगीच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली.
तिने काळजीपूर्वक गणपतीची मूर्ती वर्तमानपत्रात गुंडाळली आणि गाडीच्या मागच्या सीटवर ठेवली.
पैसे हातात घेताना तिच्या चेहऱ्यावर समाधान होते.
पण त्या आनंदापेक्षा मोठा आनंद तिच्या आणि पिंट्याच्या मनात होता.
यावर्षी त्यांच्या घरीही गणपती बसणार होता!
दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होते.
“आपण आपल्या घराच्या अंगणात भिंतीला लागून छानसा डोंगर बनवूया,” चिंगी म्हणाली.
“आणि त्यावर बाप्पांना बसवूया,” पिंट्या उत्साहाने म्हणाला.
“दोन वेळा आरती करू.”
“प्रसाद पण वाटू!”
त्यांच्या कल्पनांनाच पंख फुटले होते.
तेवढ्यात निशा दोन्ही हातांत सामानाच्या पिशव्या घेऊन गाडीपाशी आली.
मागच्या सीटवर सामान ठेवताना तिची नजर गणपतीच्या मूर्तीवर पडली.
तिने प्रश्नार्थक नजरेने शेखरकडे पाहिले.
गाडीत बसल्यावर ती म्हणाली,
“अरे, आपल्याकडे आधीच पारंपरिक मोठा पितळी गणपती आहे ना. आपण दरवर्षी त्याचीच पूजा करतो. प्रतीकात्मक म्हणून छोटासा गणपती घेतो. मग एवढा मोठा गणपती कशासाठी घेतलास?”
शेखर काही क्षण शांत राहिला.
नंतर हलकेच हसला.
“सांगतो.”
त्याने चिंगी आणि पिंट्याशी झालेला सगळा संवाद निशाला सांगितला.
गणपती विकण्यासाठी त्यांची चाललेली धडपड...
गणपती विकल्यावर मिळणाऱ्या पैशातून आणि बक्षिसातून स्वतःच्या घरात बाप्पा बसवण्याची त्यांची इच्छा...
आणि शेवटी चिंगीने आपल्याला गणपती घेण्यासाठी केलेला तो निरागस आग्रह...
सगळे सांगून शेखर म्हणाला,
“अगं, आपली मुलंही यांच्याच वयाची आहेत. फरक एवढाच की आपल्यामुळे त्यांना बरंच काही सहज उपलब्ध होतं. त्यांना एखादी गोष्ट हवी म्हटली की आपण ती घेऊन देतो. पण त्या दोघांना मात्र स्वतःचा गणपती मिळवण्यासाठी रस्त्यावर बसून तो विकावा लागतोय.”
निशाने काहीच उत्तर दिले नाही.
गाडीच्या काचेतून तिने मागे पाहिले.
दूर रस्त्याच्या कडेला चिंगी आणि पिंट्या अजूनही उभे होते.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिच्याही मनाला एक वेगळीच उब मिळाली.
पण त्याच आनंदाच्या आड समाजातील आर्थिक विषमतेची बोचरी जाणीवही होती.
शेखरने गाडी सुरू केली.
गाडीची चाके रस्त्यावरून पुढे सरकू लागली.
गाडीत मात्र दोघेही शांत होते.
गाडीच्या चाकांप्रमाणेच त्यांच्या मनातही विचारांचे चक्र वेगाने फिरत होते.
काही अंतर गेल्यावर शेखरने निशाकडे पाहिले.
“निशा... तुझ्या लक्षात आलं?”
“काय?”
शेखर काही क्षण थांबला.
मागच्या सीटवर ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीकडे त्याने पाहिले.
आणि हळूच म्हणाला,
“गरीबाचं दोन वेळचं पोट भरावं म्हणून...
कधी कधी देव स्वतःलाच बाजारात विकून घेतो.”
निशाने त्याच्याकडे पाहिले.
दोघांच्याही डोळ्यांत नकळत पाणी तरळले होते.
आणि मागच्या सीटवर बसलेला तो गणपती...
जणू काही शांतपणे त्यांच्या मनातल्या माणुसकीला आशीर्वाद देत होता.
.jpg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा