कातरवेळ वाड्यातील तुळशीपुढे पणती लावून प्रभाताई झुल्यावर येऊन बसल्या होत्या. संध्याकाळची कातरवेळ हळूहळू अंगणात उतरली होती... आकाशाच्या कपाळावर केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. दिवसभर अंग भाजून काढणारा उन्हाचा ताप ओसरला होता. वाऱ्याची मंद झुळूक अंगाला स्पर्श करून जात होती. पाखरांचे थवे दिवसभराची धावपळ संपवून घरट्यांकडे परतत होते. सगळे आपापल्या घरट्याकडे परतत होते... फक्त प्रभाताईंच्या घरट्यातली पाखरं दूर होती. झुला हळूहळू पुढे-मागे होत होता. पण झुल्यावर प्रभाताईंचं शरीर होतं... त्यांचं मन मात्र कितीतरी दूर, मुलांकडे भटकत होतं. मळ्यात गेलेले किशोरराव अजून परतले नव्हते. त्यांची वाट पाहत असतानाच प्रभाताईंच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा डोकं वर काढत होता— "या गणपतीला तरी मुलं-सुना येतील का?" प्रश्न साधा होता... पण त्याचं उत्तर मिळण्याआधीच त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. आताशा घर त्यांना खायला उठत होतं. हेच ते घर... कधी मुलांच्या किलबिलाटाने भरलेलं. कधी सुनेच्या हसण्याने गजबजलेलं. कधी नातवंडांच्या धावपळीने दणाणून गेलेलं. गणपतीच्या दिवसांत तर या वाड्याला घर...