माणसापेक्षा आयफोन महाग ? काही घटना केवळ बातम्या नसतात… त्या समाजाच्या चेहऱ्यावर आरसा धरतात. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावच्या खवड्या डोंगरावर घडलेली घटना अशीच काळीज पिळवटून टाकणारी आहे. अवघा १९ वर्षांचा कुणाल. आयफोनच्या हट्टासाठी डोंगराच्या कड्यावर उभा राहिला— “आयफोन द्या, नाहीतर जीव देईन.” मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी त्याचा हात पकडला; पण दुर्दैवाने मुलगा दरीत कोसळला आणि त्याच्यासोबत वडिलांचाही अंत झाला. हे दुःख सहन न झाल्याने आईनेही दरीत उडी घेतली. एका वस्तूच्या हट्टाने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज चर्चा होईल—दोष कोणाचा? संस्कार कुठे कमी पडले? आजची पिढी अशी का झाली? पण त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे— आयफोन महाग की माणसाचं जीवन? मोबाईल, आयफोन, लॅपटॉप ही आपल्या सोयीची साधनं आहेत; पण आज काही वेळा साधनंच भावनांवर राज्य करू लागली आहेत. मुलाच्या हातातला मोबाईल आपण पाहतो; पण त्याच्या मनात काय चाललंय, हे पाहतो का? मुलांचे प्रत्येक हट्ट पुरवताना आपण नकळत त्यांना “मला हवं ते मिळालंच पाहिजे” असं शिकवत नाही ना? म्हणून मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा नकार पचवायला, अपयश स...