रामभाऊ रामभाऊ आज खूप आनंदात होते. कॅनडाला असलेल्या मुलीकडे आणि जावयाकडे चार महिने, तर अमेरिकेतील मुलाकडे आणि सुनेकडे चार महिने राहून ते तब्बल आठ महिन्यांनी भारतात परतले होते. दोन दिवसांत घरातील पसारा आवरला. परदेशातून आणलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या. आणि आज आठ महिन्यांनी पहिल्यांदा ते पेन्शन काढण्यासाठी बँकेत गेले. पासबुक घेतले. विथड्रॉल स्लिप भरली. आणि कॅशियरच्या खिडकीसमोर जाऊन उभे राहिले. कॅशियरने एकदा रामभाऊंकडे पाहिले, एकदा संगणकाच्या स्क्रीनकडे पाहिले आणि पुन्हा रामभाऊंकडे पाहिले. रामभाऊंना वाटले, काय झालं? एवढं काय पाहतोय? कॅशियर म्हणाला, “रामभाऊ, तुम्ही मॅनेजर साहेबांना भेटून या.” “का बरं?” “तुमचे पैसे निघू शकत नाहीत.” “का?” “ते साहेब सांगतील.” रामभाऊ मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले. मॅनेजरने संगणकावर काहीतरी तपासले आणि म्हणाले, “रामभाऊ, तुमच्या खात्याला चार महिन्यांपूर्वी ‘मृत’ असा स्टेटस लागला आहे.” “काय?” रामभाऊंच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणात गायब झाले. “पण मी तर तुमच्यासमोर जिवंत उभा आहे!” मॅनेजर म्हणाले, “हो, ते मला दिसतंय.” “मग माझं अकाउंट मृत ...